Tuesday, October 24, 2023

ऐलमा पैलमा आठवणीतला

 

दोन दिवसांपूर्वी कुणीतरी भोंडल्याचा व्हिडीओ  पाठवला आणि माझ्या मनांत माझ्या लहानपणीच्या भोंडल्याच्या आठवणी जाग्या झाल्या.  माझे बालपण पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ( H.A. Colony  ) वसाहतीमध्ये गेले.  आमच्या या खूप मोठ्या वसाहतीमध्ये महाराष्ट्र आणि इतर प्रांतातून आलेली  अनेक कुटुंबे होती. बऱ्याच मराठी कुटुंबांमध्ये तेव्हा भोंडला केला जायचा, तेव्हा गरब्याचे आक्रमण झाले नव्हते.  गरबा गुजराथी कुटुंबांपरताच मर्यादित होता. काही घरात नऊ दिवस तर काही घरात एखादा दिवस भोंडला असायचा. दुपारी चार वाजता भोंडल्याला  सुरुवात व्हायची सगळीकडचे भोंडले खेळून आम्ही आठ वाजे पर्यंत घरी जायचो, त्यातच ज्यांच्याकडे रोज भोंडला असायचा त्यांच्याकडे आधी भोंडला खेळायचा.  त्याचाही क्रम ठरलेला असायचा आमच्या घरचा भोंडला १० दिवसांचा असायचा. आमच्याकडच्या भोंडला म्हणज़े सगळ्या मुलींचे आकर्षण असायाचे तेव्हा बहुधा  मुलीच भोंडला खेळात आत्तासारख्या मोठ्या स्त्रिया निदान आमच्या वसाहतीमध्येतरी खेळात नसत. त्यावेळी आत्तासारख्या भोंडल्याच्या स्पर्धाही नसायच्या . माझ्या आई आणि वडिलांना खूप हौस होती.  वडील उत्तम कलाकार असल्याने, पाटावर रोज वेगळे हत्तीचे चित्र रेखाटले जायचे.  ते चित्र कधी पण फुलांनी तर कधी विविध रंगानी, धान्यांनी  सजवले जायचे.  भोंडल्याचे  सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे खिरापत  आणि ती खिरापत ओळखणे. आमच्या घरी रोज वाढती खिरापत असायची दसऱ्याच्या  दिवशी १० खिरापती  असायच्या .   माझी आई सुगरण होती,  हे माझे म्हणणे नाहीतर आमच्या सगळ्या सग्यासोयऱ्यांचे मत आहे. तिच्या सुग्रणपणाची  लोक अजूनही आठवण काढतात. हा सुगरपणणा अर्थात खिरापतींमध्येही दिसून यायचा, त्यात नावीन्य असायचे.  आत्ताच्या भाषेत ट्विस्ट, हटके  असायचा ह्या खिरापती ओळखणे मोठे आव्हान असायचे.  त्या ओळखण्यासाठी  संकेत  ( क्लूज ) दिले  जायचे.  आपले अंदाज बरोबर येऊन खिरापत  ओळखल्याचा  आनंद  वेगळाच  असायचा .  भोंडल्यामध्ये  मुलांचा  सहभाग  नसल्यामुळे  काही  खोडकर  मुले  खिरापत फोडण्यात आनंद मानायची. तीही एक वेगळीच मजा असायची.   शेवटच्या दिवशी दसऱ्याला १० खिरापती बरोबर पॉट आईसक्रिम असायचे.  माझे वडिल स्वतः  ते  आईसक्रिम बनवायचे.   मुलींना  द्यायला  आणि हत्ती  सजवायला  पुण्याहून गजरे आणि  फुले  आणली  जायची.  परंतु हे सगळे करताना पदार्थ  खिरापतीसाठीच  बनवले आहेत  याचे भान राखले जायचे.  एकूणच कोणताही बडेजाव नसायचा.   मला असे वाटते भोंडल्याचे  पारंपरिक स्वरूप आज बदलले आहे.  यानिमीत्ताने माझ्या भोंडल्याच्या आठवणी  जाग्या झाल्या व पुन्हा लहान व्हावेसे वाटले.



Wednesday, December 1, 2021

मराठी चित्रपटसृष्टीतील ध्येयवादी व तत्त्वनिष्ठ निर्माते दिग्दर्शक कै. दत्ता धर्माधिकारी

 मराठी चित्रपटसृष्टीतील ध्येयवादी व तत्त्वनिष्ठ निर्माते दिग्दर्शक कै. दत्ता धर्माधिकारी





 २ डिसेंबर - मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे निर्माते दिग्दर्शक यांची आज जयंती. 

१९५० नंतर "बाळा जो जो रे" , " स्री जन्मा ही तुझी कहाणी" , " चिमणी पाखरं" हे सलग तीन रौप्यमहोत्सवी चित्रपट काढून त्यानी विक्रम केला. स्रीसमस्याप्रधान, पुरोगामी विषय मांडून त्यानी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले होते.


सुप्रसिध्द सिनेपत्रकार व समीक्षक इसाक मुजावर यानी लिहलेल्या "गाथा मराठी सिनेमाची " या पुस्तकात दत्ता धर्माधिकारी यांच्याबदल एकूण ६ भागात माहिती दिली आहे. यावरुन मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे स्थान कळते.

इसाक मुजावरानी लिहलेल्या लेखातील काही अंश उधृत करुन या ध्येयवादी मराठी निर्मात्याच्या आठवणी जागवत आहे.