स्मरण माणिक वर्मा यांचे
नमस्कार!
माझ्या मित्र मैत्रिणींनो कसे आहात? आपली काळजी घेताय ना?
आज मी खूप दिवसांनी माझ्या या ब्लॉगवर लिहीत आहे. त्याला कारणही तसंच आहे. काल माणिक वर्मा यांचा जन्मदिवस. ९४ वर्षांपूर्वी दादरकरांच्या घरात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई, माई दादरकर याही गाणाऱ्या होत्या. पण मला मात्र आठवतात त्या गोऱ्यापान कपाळावर मोठं कुंकू असलेल्या माई. अतिशय प्रेमळपणे बोलणाऱ्या. पुण्यात बाजीराव रोडला चितळ्यांच्या दुकानाशेजारी जे ‘स्वागत भांडार’ नावाचे दुकान आहे, ते माणिक वर्मा यांच्या भावाचे व ती इमारत ‘स्वरसाधना’ दादरकरांची.
आता मला त्यांच्याबद्दल इतके कसे माहित तर त्यांचे कुटुंबीय आणि माझ्या वडिलांचे कुटुंबीय नाशिक पासून एकमेकांशी परिचित. त्यामुळे दादरकर कुटुंबीयांचे आणि आमचे एकमेकांकडे खूप येणे-जाणे होते. घरोब्याचे संबंध होते म्हणाना. मी खूप लहान होते पण मला आठवते त्या पुण्याला आल्या किंवा पुण्यात असल्या कि एकदा तरी आमच्या घरी पिंपरीला एच ए कॉलनी मध्ये यायच्या. १९७८ साली माझ्या दोन्ही भावांच्या मुंजीला ही त्या दोन-तीन दिवस आल्या होत्या. आमच्या कॉलनीच्या गेस्ट हाउस मध्ये त्यांची रहायची सोय केली होती कारण घरात माणसेहि खूप होती आणि मला वाटते त्या बर्याच मोठ्या आजारातून तेव्हा बर्या झाल्या होत्या. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दी बद्दल अनेकांना माहिती आहे. परंतु मला आठवते ते त्यांचे साधे, सोज्वळ, आणि घरेलू व्यक्तिमत्व. अत्युच्च शिखरावर असलेली, पद्मश्री मिळालेली व्यक्ती इतकी साधी असू शकते हे आता जाणवत आहे. त्यांचे यजमान अमर वर्मा जे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध कवी होते. तेही त्यांच्यासारखेच अतिशय साधे होते. मला नेहमीच असं वाटतं की माझं बालपण खूप समृद्ध गेलं. अनेक नामवंत व्यक्तींना खूप जवळून पाहता आले. त्यावेळी आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीशी बोलतो आहोत , याची जाणीवही नसायची. माणिकआत्या आणि आमचा खरंतर दुहेरी परिचय. एक आधीच लिहिल्याप्रमाणे वडिलांकडून आणि दुसरा परिचय माझ्या मावशीचे यजमान प्रख्यात संगीत शिक्षक पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्या त्या गुरु भगिनी. काल फेसबूक वर त्यांच्या जन्मतिथि निमित्त त्यांचे भाऊ श्रीकांत दादरकर यांनी त्यांचे स्मरण केलेले पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आठवणी अनेक आहेत त्याबद्दल नंतर कधीतरी.
*कै. माणिक आत्यांना शतशः प्रणाम*
🌺🌺🌺🙏🙏🙏💐💐💐
=====================
*घरी राहा. सुरक्षित राहा*
------------------------------------------
© Dr. Priyamwada P. Joshi