वाङमयचौर्य - बौद्धिक, शैक्षणिक क्षेत्रातील एक आव्हान
वाङमयचौर्य ( plagiarism ) ही संकल्पना आपल्याला नवीन नाही.
वाङमयचौर्य व्यापार, कला, साहित्त्य,
शिक्षण इ. सर्वच क्षेत्रात होत आलेले आहे. लेखक, संपादक,कलाकार, कवी, चित्रपट निर्माते, फॅशन डिझायनर्स, सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, वास्तुविशारद, संशोधक, व विद्यार्थी अशा अनेकाना वाङमयचौर्य
करण्याचा मोह कधीना कधी होतोच.
वाझमयचौर्य हे बौध्दिक अप्रामाणिकता ( Intellectual dishonesty ) म्हणून
मानले जाते.
वाङमयचौर्य हा गुन्हा (Crime) नाही, परंतु तो काही
बाबतीत स्वामित्त्वहक्क ( Copyright
Act ) कायद्याचा भंग ठरु शकतो. औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात
वाङमयचौर्य हा गंभीर नैतिक गुन्हा आहे. वाङमयचौर्य आणि
स्वामित्त्व हक्काचा भंग ( Infringement of copyright ) या
दोन गोष्टी सारख्या वाटत असल्या तरी त्यात फरक आहे. चित्रपट, गीते, पुस्तके, कथा, फोटो, चित्रे, कलात्मक वस्तू,
सॉफ्टवेअर्स याच्या निर्माणकर्त्याना स्वामित्त्व हक्क दिले जातात.
जर यापैकी कशाचाही एखादा भाग वा पूर्ण कलाकृती मूळ निर्माणकर्त्याच्या
परवानगीशिवाय आर्थिक फायद्यासाठी किंवा व्यापारी तत्त्वासाठी वापरुन मूळ
निर्मात्याला त्याचा योग्य मोबदला दिला नाही तर तो स्वामित्त्वहक्क कायद्याचा भंग
ठरतो.
लेखनात, शोधनिबंधात, कलाकृतीत इतर
स्रोतातील माहितीचा समावेश केला असेल आणि मूळ संदर्भाचा, स्त्रोताचा
उल्लेख केला नसेल तसेच मूळ लेखकाला त्याचे श्रेय न देता स्वत:च्याच नावावर खपविले
असेल तर ते वाङमयचौर्य ठरते. दुसर्याच्या लिखाणातील काही
शब्दाना पर्यायी, समानार्थी शब्द वापरुन उर्वरीत भाग तसाच
ठेवणे, दुसर्या साहित्त्यातील रुपके जशीच्या तशी वापरणे,
स्वत:च्याच पूर्वलेखनाचा किंवा माहितीचा समावेश नवीन लिखाणात संदर्भ
न देता करणे हे ही वाङमयचौर्यच आहे, मात्र सर्वमान्य तथ्ये,
संकल्पना अशा माहितीचा समावेश संदर्भाशिवाय केला तर ते वाङमयचौर्य
होत नाही. उदा. लिंबू हे व्हिटॅमिन “सी” चे उत्तम स्रोत आहे.
थोडक्यात स्वामित्त्वहक्क कायदा कलाकृतीच्या
वापराची परवानगी व मोबदला याच्याशी निगडीत आहे, तर वाङमयचौर्य मूळ स्त्रोताच्या निर्माणकर्त्यास
श्रेय न देणे ( attribution ) याच्याशी निगडीत आहे.
स्वामित्त्वहक्क भंगाच्या अटी / नियम व शिक्षा
त्या त्या देशाच्या स्वामित्त्वहक्क कायद्यात दिलेल्या असतात.
वाङमयचौर्याबद्दलच्या अटी व शिक्षा ह्या संस्था ठरवतात, उदा. नॉर्थ कॅरोलिना स्टेट युनिर्व्हसिटी,
जॉर्जटाऊन युनिर्व्हसिटी यानी वाङमयचौर्याबाबत नियमावली केली आहे.
वाङमयचौर्य हे सहेतूक, जाणूनबुजून नियोजन करुन केलेले
असते, त्याचप्रमाणे ते अजाणतेपणेही होऊ शकते. परंतु तरीही तो
नैतिक गुन्हाच ठरतो. या संदर्भात भारतीय लेखिका काव्या विश्वनाथनची २००६ साली
घडलेली घटना प्रसिध्द आहे. २००६ साली ती पौगंडावस्थेत असताना तिने " हाऊ ओपल
मेहता गॉट किस्ड " ही कादंबरी लिहली. त्यातील काही भाग मेगन मॅककॅफेट्री या
लेखिकेच्या लिखाणाला समांतर होता, त्यासाठी तिने माफी
मागताना सांगितले होते कि, हे ठरवून किंवा जाणूनबुजून झालेले
नाही, परंतु हे अमान्य केले गेले आणि तिचे आर्थिक नुकसान
झालेच आणि तिची साहित्त्यिक कारकिर्द संपुष्टात आली.
वाङमयचौर्य सर्वच क्षेत्रात होत असले तरी
शैक्षणिक क्षेत्रातील वाङमयचौर्याची गांभिर्याने दखल घेतली पाहिजे. शैक्षणिक
क्षेत्रात अनेक कारणामुळे वाङमयचौर्याचे प्रमाण वाढत आहे. पदवीपूर्व व पदव्युत्तर
विद्यार्थ्याना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून द्यावे लागणारे प्रकल्प, केवळ बढतीसाठी एम.फिल व पी एच
डी करणे, युजीसीची बढतीसाठी ठराविक संख्येत शोधनिबंध प्रसिध्द करण्याची अट या व
अशा अनेक कारणांमुळे बौध्दिक लिखाणाचे (academic writing) प्रमाण
वाढले आहे. त्याचबरोबर इंटरनेट व ‘Open Access Literature’
यामुळे कॉपी ( ctrl c ) व पेस्टचे ( ctrl v) प्रमाण वाढले आहे.
२०११ साली जवळ जवळ ८० पेक्षा जास्त ब्रिटिश
विद्यापीठांमधे १७०० हून अधिक वाङमयचौर्याच्या घटना उघडकिस आल्या, तर २०१२ साली हाॅवर्ड
विद्यापीठामधे १०० हून अधिक वाङमयचौर्याच्या घटना घडल्या. अलिकडेच सावित्रीबाई
फुले पुणे विद्यापीठातील ६०० प्राध्यापकांच्या अनुदानित संशोधन प्रकल्पावर आधारीत
शोधनिबंधात वाङमयचौर्य आढळल्याची बातमी सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर वाङ्मयचौर्यावर
योग्य नियंत्रण ठेवले व उपाययोजना केल्या तर माहितीचा प्रामाणिक वापर होईल आणि वाङ्मयचौर्याचे प्रमाणही कमी होईल. यासाठी खालिल
गोष्टिंचा अवलंब करता येईल.
१)
संशोधनमूल्ये, बौध्दिकसंपदा हक्क कायदे याबद्दल जागरुकता निर्माण करणे. स्वामित्त्वहक्क
कायदा शिकवताना फेअरयुज या संकल्पनेवर अधिक भर द्यायला हवा.
२)
वाङमयचौर्य टाळण्यासाठी शिक्षण व प्रशिक्षण देणे, आणि जागरुकता निर्माण करणे आवश्यक
आहे.
३)
संशोधन पद्धती
(Research Methodology) हा विषय गांभीर्याने शिकवण्याची गरज आहे.
४)
MLA style, APA
style अशा संदर्भ देण्याच्या पध्दतीबद्दल मार्गदर्शन गरजेचे आहे.
५)
End note, Ref. Work,
Mendeley, Zotero यासारख्या संदर्भ व्यवस्थापन साधनांचा
(Reference Management Tools) वापर करण्याचे प्रशिक्षण देऊन त्याचा
वापर करण्यास उद्युक्त करणे.
६)
संस्थांच्या ग्रंथालयातून माहिती साक्षरतेचे कार्यक्रम आखून
माहितीचे योग्य स्रोत शोधणे, त्याचे मूल्यमापन करणे, माहिती एकत्र करणे व ती
मांडणे याचे प्रशिक्षण देणे. उत्तम प्रकाशक, प्रकाशने इ .
बद्दल माहिती देणे.
७)
विद्यापीठांनी वाङ्मयचौर्य
आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
८)
शैक्षणिक संस्थांनी वाङ्मयचौर्याबद्दल मार्गदर्शक तत्वे तयार करावीत.
९)
प्रकाशकांना कोणतेही साहित्य, संशोधन निबंध, लेख प्रकाशित करण्यापूर्वी, त्यांतील वाङ्मयचौर्याचे प्रमाण तपासूनच प्रकाशित करण्याचे बंधनकारक करावे.
१०) वाङ्मयचौर्य शोधून करणारी अनेक anti plagiarism software उपलब्ध आहेत, त्यातील काही विनाशुल्क आहेत, उदा. copyleaks , Dupli checker, Paper rater, Plagiarism checker,
Plag scan , Plag Tracker. त्याचप्रमाणे
काही सशुल्क देखील उपलब्ध आहेत, जी संस्थांना विकत घ्यावी
लागतील. उदा . Turnitin,
Plagiarism scanner, copy scape, Urkund इत्यादि . ह्या सॉफ्टवेअर्स
च्या सहाय्याने वाङ्मयचौर्याचे प्रमाण
कळते. कोणता भाग दुसऱ्या लेखातून, पुस्तकातून
घेतला आहे ते कळते, आणि सखोल अहवाल ( Report) मिळतो.
वाङ्मयचौर्याचे होणारे परिणाम गंभीर आहेत, त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर संशोधनाचा
दर्जा खालावून नवनिर्मिती खुंटेल.
वाङ्मयचौर्य केलेले आढळल्यामुळे संशोधन निबंध मागे घेण्याचे भारतातील प्रमाण
जागतिक सरासरीपेक्षा १७% अधिक आहे.
२०११ साली जर्मनी मध्ये
संरक्षणमंत्री डॉ . कार्ल थेडॉर, झू गुटेनबर्ग यांना त्यांच्या पी एच डी च्या प्रबंधात काही
उतारे इतर लेखकांच्या साहित्यातून घेतले या कारणास्तव संरक्षणमंत्रीपद सोडावे लागले होते. अजून एक
जर्मन मंत्री मिस अॅनेट शॅवन यांनाही अशाच कारणासाठी आपली
डॉक्टरेट हि पदवी परत करावी लागली , अशी उदाहरणे जागतिक
पातळीवर देता येतील.
कोणत्याही प्रकारचे चौर्य हा गुन्हाच आहे. पैसा, संपत्ती, दृश्य वस्तूंची चोरी शोधणे त्यामानाने सोपे आहे,
परंतु माहितीच्या अफाट
महासागरात लेखन, शब्द, आकृत्या,
चित्र, कलाकृती यांचे चौर्य शोधणे अवघड आहे. सध्या पुढे येत असलेल्या वाङ्मयचौर्याच्या विविध घटना हे हिमनगाचे एक टोक आहे,
युजीसीने अलीकडेच शैक्षणिक संस्थांना Urkund या anti
plagiarism software च्या
सहाय्याने पदव्युत्तर, एम फिल, संशोधन
प्रकल्पातील व पी.एच.डी. इ. च्या प्रबंधातील वाङ्मयचौर्य
तपासणे बंधनकारक केले आहे.
माहितीजालातून
(इंटरनेट) सहज उपलब्ध होणारी माहिती व तंत्रज्ञानातील विविध सोयी
सुविधांमुळे वाङ्मयचौर्य करणे सहजशक्य झाले आहे, परंतु वाङ्मयचौर्याचा शोध घेण्यासाठीहि तंत्रज्ञान विकसित झालेले आहे.
अर्थात यातून मुद्रित ( print ) साहित्याचे केलेले
वाङ्मयचौर्य सापडणे अशक्य आहे. सरतेशेवटी बौद्धिक प्रामाणिकपणा ( Intellectual
honesty ) रुजवण्यासाठी, जोपासण्यासाठी
संबंधित व्यक्तींनी आपल्या
सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून, नीतिमूल्यांचे भान ठेऊन
निर्मिती करणे गरजेचे आहे.
बौद्धिकदृष्ट्या सक्षम, सशक्त आणि सुसंकृत समाज
निर्माण करण्यासाठी याची नितान्त गरज आहे.
No comments:
Post a Comment