Source http://ilovelibraries.org/article/celebrate-national-library-week-2018
अमेरिकेतील राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताहा निमित्ताने
एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यात प्रामुख्याने अमेरिकेत राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह साजरा केला जातो. ग्रंथालयांबद्दल लोकांना माहिती मिळून त्यांचा वापर वाढवा व राष्ट्रीय आणि सामाजिक विकासातिल ग्रंथालये आणि ग्रंथपाल यांचे योगदान लोकांना माहित व्हावे या उद्देशाने १९५८ सालापासून अमेरिकेत ग्रंथालय संघ हा सप्ताह साजरा करित आहे. दरवर्षी एखाद्या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रम या काळात ग्रंथालयांमार्फत राबवले जातात.
१९५० सालच्या मध्यात अमेरिकेत लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ वाचन करण्या ऐवजी आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमांमध्ये घालवतात असे आढळून आले. लोकांना फावल्या वेळात अधिकाधिक वाचन करण्यास उद्युक्त करण्यासाठी अमेरिकन ग्रंथ प्रकाशक आणि अमेरिकन ग्रंथालय संघाने १९५४ साली राष्ट्रीय ग्रंथ समिती स्थापन केली. वाचन संस्कृती वढविण्याबरोबरच वाचनातून आरोग्य आणि उत्पन्न वाढविणे, सशक्त व आनंदी कुटुंब निर्माण करणे अशीही या समितीची उद्दिष्टे होती. यातूनच पहिला राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह १६ ते२२ मार्च १९५८ या काळात साजरा केला. त्या वेळची संकल्पना होती ‘ वेक अप अॅन्ड रीड’. त्या नंतर दरवर्षी विविध संकल्पनांवर राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह साजरा केला गेले. जसे रिडिंग इज द सत्कार, इनफर्मेशन पॉवर, यूज युवर लायब्ररी इ.
या वर्षीचा राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह ७ एप्रिल ते १३ एप्रिल २०१९ या काळात साजरा होत आहे. या वर्षीची संकल्पना आहे Libraries = Strong Community (ग्रंथालय = सशक्त समाज). ग्रंथालये हि शहरे, गावे, शैक्षणिक आणि इतर संस्था यांच्या केंद्र स्थानी आहेत. ही एक अशी जागा आहे जिथे सर्व वयाची, आर्थिक स्तराची, जाती धर्माची लोकं एकत्र येऊन, संवाद साधून, नवनवीन गोष्टी शिकून एक सशक्त समाज निर्माण होईल हा या संकल्पने मागचा उद्देश आहे.
या वरून प्रेरणा घेऊन इतर अनेक देशांमध्येहि राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह साजरा केला जातो. भारतात १९६८ सालापासून नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. यु. के. मध्ये ऑक्टोबर ममहिन्याचा दुसर्या आठवड्यात साजरा केला जातो.
सर्वच ग्रंथालयांनी असे सप्ताह साजरे करून माहितीच्या नवीन स्त्रोतांची आणि साधनांची ओळख करून द्यायला हवी. माहितीच्या महाजालात एका क्लिकने जरी माहिती मिळत असली तरी त्या माहितीची सत्यता पडताळणे , वैध माहिती स्त्रोतांचा वापर, वांड़मयचौर्य या बद्दल जागरूकता निर्माण करून जास्तीत जास्त वाचकांना ग्रंथालयांकडे आकृष्ट करणे, ह्या सप्ताहाच्या निमित्ताने साध्य होते. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असे सप्ताह साजरे व्हायला हवेत.
डॉ. प्रियंवदा प्रमोद शौचे-जोशी
No comments:
Post a Comment