मराठी चित्रपट सृष्टीत विस्मरणात गेलेले नाव दत्ता धर्माधिकारी
दत्ता धर्माधिकारी हे खरेतर एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल नांव. परंतु अलीकडच्या काळात या नावाची फारशी दखल कोणी घेत नाही. २०१२ साली त्यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. परंतु मराठी चित्रपट सृष्टी आणि माध्यमांनी याची फारशी दखल घेतली नाही. हे सगळे लिहायचे कारण आज दोन डिसेंबर त्यांचा जन्मदिवस. आज सकाळी मुंबई आकाशवाणीने त्यांच्याबद्दल थोडी माहिती देऊन त्यांच्या चित्रपटातील काही गाणी लावली. ते ऐकल्यावर असे वाटले अरे खरे तर एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल फारच कमी माहिती आहे आणि म्हणूनच हा लेखन प्रपंच.
दत्ता धर्माधिकारी यांनी आपल्या चित्रपट क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात प्रभात स्टुडिओमध्ये टाईम कीपर म्हणून केली. त्यानंतर व्ही शांताराम, फत्तेलाल, दामले यांचे सहाय्यक दिग्दर्शक आणि नंतर स्वतंत्र निर्माता आणि दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास. त्यांनी स्वतःची आल्हाद चित्र ही संस्था स्थापन केली होती.
त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बाळा जो जो रे (मातृप्रेम ), स्त्री जन्मा ही तुझी कहाणी (बलात्कारित कुमारी मातेचा प्रश्न), भाग्यवान (अंधश्रद्धा निर्मूलन), एक धागा सुखाचा (अपंग मुलांचे दुःख), अबोली (मुक्या बहिऱ्या मुलीची व्यथा), सावधान (दारू चे प्रश्न), सुहागन (स्त्रियांनी पैशाच्या मायावी दुनियेत फसू नये), सबसे बडा (रुपय्या पैशाने सर्व काही मिळत नाही), चिमणी पाखरं हे व असे अनेकविध विषय त्यांच्या हिंदी आणि मराठी चित्रपटात हाताळले. यातील बरेच चित्रपट सत्य घटनांवर आधारित होते हेही त्यांच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य. यासारख्या सामाजिक चित्रपटांबरोबरच अखेर जमलं, आलिया भोगासी, लग्नाला जातो मी यासारख्या विनोदी चित्रपटांची निर्मिती केली. थांब लक्ष्मी कुंकू लावते, सतीच वाण, सतीची पुण्याई यासारखे धार्मिक आणि पौराणिक चित्रपटही केले. चित्रपट दिग्दर्शनाबरोबरच दैवे लाभला चिंतामणी, कुंकू जपून ठेव या नाटकांचे दिग्दर्शन करून तिथेही आपला ठसा उमटवला. एकच चित्रपट एकाच वेळी तीन भाषांमध्ये निर्माण करणारा हा भारतातील पहिला निर्माता आणि दिग्दर्शक.
या मायावी सृष्टीत राहूनही साधेपणा आणि शांतपणा हे त्यांचे गुण होते. मधुसूदन कालेलकर यांनी त्यांच्या ‘मधुघट’ या व्यक्तिचित्र संग्रहात त्यांच्यावरील लेखाला शीर्षकच मुळी ‘खरा ब्राह्मण’ असे दिले. ते लिहितात “धर्माधिकारी हे नावच चित्रपट धंद्यात कसेसेच वाटते. एखादी गाडी सांधे बदलण्यात चूक झाल्यामुळे जशी भलत्याच लाईन वरून जाते तसेच हे झाले असावे. नाहीतर इतका सज्जन, साधा, निर्व्यसनी माणूस या धंद्यात आला नसता. धर्मराजानंतर अजातशत्रू म्हणून दत्तोबा यांचं नाव घ्यायला हरकत नाही . अत्युच्चपदी थोरही बिघडतो ही उक्ती धर्माधिकार्यांना कधीच लागू पडली नाही. वैभवाच्या शिखरावर (४ते५ परदेशी गाड्या) ते धवलगिरी सारखे भासतात.” तर इसाक मुजावर त्यांच्या ‘शेवटची भेट’ या पुस्तकात लिहितात “या चित्रपट सृष्टीत अनेक वर्षे असूनही ते सर्वोदय वादी राहिले होते. चित्रपटांच्या मोहमयी दुनियेत वावरूनहि ते बाई आणि बाटली पासून सदैव दूर राहिले. यामुळे त्यांचा उल्लेख चित्रपट व्यवसायातील चित्रपट व्यवसायातील धुतल्या तांदळासारखा स्वच्छ माणूस असा केला जायचा.” म्हणूनच त्यांच्या निधनानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा किरण म्हणाल्या होत्या “त्यांचा पाठीवरून फिरलेला हात नेहमीच आश्वस्त पित्याचा वाटायचा.”
त्याकाळात आल्हाद चित्र कंपनीचे मोठे कार्यालय डेक्कन स्टुडिओत होते. त्यांची क्रिकेट टीमही होती. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची काळजीही ते खूप घेत. त्यांनी कंपनीतील प्रत्येकाचे बँकेत खाते उघडले होते. पगारातील ठराविक रक्कम त्यात टाकली जायची व तेवढीच रक्कम अल्हाद चित्र तर्फे त्या त्या खात्यात जमा व्हायची.( थोडक्यात पीएफ) त्याकाळात त्यांनी पडद्यामागील कर्मचाऱ्यांचा भविष्याचा विचार केला होता हे किती जणांना माहित आहे. केलेल्या उत्तम कामाची प्रसिद्धी मिळवायची असा त्यांचा स्वभावच नव्हता. ज्या सहकाऱ्यांवर त्यांनी मुलांप्रमाणे प्रेम केले त्याच सहकाऱ्यांनी त्यांच्या साधेपणाचा आणि अव्यवहारी पणाचा गैरफायदा घेतला व स्वतःच्या इस्टेटी केल्या. मराठीतील अनेक प्रतिथयश कलावंतांना त्यांनी रजत पटावर प्रथम संधी दिली मात्र त्यांचे हे ऋण फारच थोडे जण मान्य करतात हे ही मोठे दुर्दैव.
त्यांच्या निधनाची दखल बी.बी.सीनेही घेतली होती. विशेष म्हणजे त्यांच्या निधनाचे बातमी आणि जपान या देशातही प्रसारित केली होती.
खंत एकच वाटते या अशा व्यक्तिमत्वाला आजची मराठी चित्रपट सृष्टी विसरली आहे. नाही म्हणायला त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रवींद्र नाट्य मंदिर येथे झालेल्या २०१२ च्या ‘थर्ड आय’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात श्री. सुधीर नांदगावकरांनी ‘चिमणी पाखरं’ हा चित्रपट दाखवला होता.
“महात्मा“ हा चित्रपट त्यानी तीन भाषांत काढला तेव्हा “ फिल्म इंडियाचे बाबुराव पटेल यांनी ‘सॅल्यूट टू धर्माधिकारी’ या लेखात त्याना गौरविले होते. ते आम्हा सर्व कुटुंबियांचे काका. त्यांना त्यांच्या १०७ व्या जयंतीनिमित्त आम्हा सर्वांकडून विनम्र अभिवादन.
_डॉ. प्रियंवदा शौचे जोशी
उत्तम माहिती मिळाली. जुन्यापैकी फारच थोड्या अश्या दिग्गज कलाकारांची आपल्याला माहिती असते. असे जुने कलात्मक चित्रपट आजही भारावून टाकतात. खरतर असे जुने कलात्मक चित्रपट मराठी चॅनेलवर दाखवायला हवे म्हणजे लोकांना ते पाहता येईल आणि माहिती
ReplyDeleteदेखील होईल. तुमच्या या उत्तम प्रयत्नांना मनःपूर्वक धन्यवाद.